आला वसंत आला
सकाळी पाच साडे पाचला उठावे .आवरून पावणेसहाला बाहेर पडावे. देवळालीत बर्याच बागा आहेत. एखाद्या बागेत जावे. सहा ते पावणेसात दणकून चालावे. नवरा व्यायाम करायच्या साधनांकडे वळला की आपण पण थोडेफार कंबर , गुडघे वगैरेचा थोडा जादाचा व्यायाम करावा. नंतर एखादा बाक पकडावा. मान नीट बाकाच्या पाठीवर टेकेल अशी पोझ घ्यावी आणि आकाशाच्या दिशेने पहावे. मस्त फिकट निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर हिरव्यागार पानांनी लगडलेल्या झाडाच्या फांद्या , वरून घाईघाईने उडत जाणारे पक्षी, झाडांमधून ऐकू येणारी पक्ष्यांची किलबिल, मधूनच ऐकू येणारी कोकीळेची सुरेल तान यामुळे मन प्रसन्न होत जाते. बदामाची काळपट बदाम ल्यालेली नखरेल फांदी , आकाशाचे छोटे छोटे तुकडे दाखवणारी वडाची भरगच्च जाळी, मोहोर न येता केवळ वसंताची नवी पालवी फुटलेला आंबा लक्ष वेधून घेत असतात. मॅडचॅपसारखी जास्वंदी, तगर भरभरून फुलतात. हे का फुलले म्हणून मोगर्याच्या कळ्या डोकावतात आणि फुलून सगळ्या...