मित्रवर्य
काल खूप खूप दिवसानंतर माझा प्रिय मित्र भेटला. तब्येतीच्या तक्रारीमुळे डॉक्टर कडे काही तपासण्या करणे अनिवार्य होते.रिक्षाने जाताना अचानक त्याचे असणे जाणवले. त्याचा तो खर्जातला धीरगंभीर आवाज,सगळ्या वातावरणात जाणवत होता. हवेच्या थंडगार लहरी जाणवायल्या लागल्या . मनाला जाणवले हा काय इथेच आहेना तो! डाव्या हाताला त्याचे darshan झाले.समुद्राचे!! पावसाळ्यातला तो समुद्राचा खास राखाडी रंग, नेहमीपेक्षा कमी गर्दी असल्याने दिसणारी जुहूच्या समुद्र किनाऱ्या वरची पांढरीशुभ्र वाळू ,भरून आलेले आभाळ सारे मला एक शांतपणा देवून गेले.समुद्राच्या त्या निव्वळ ओझरत्या भेटीने सुद्धा किती बरे वाटले. उद्या मित्रदिना च्या निमित्ताने खूप शुभेच्छा येतील ,आठवणी जागतील,पण त्याचे लाटांचे आवाज आणि माझे निशब्द बोल ह्यातून उमललेली मैत्री! तिला कोणत्या शुभेच्छा देवू?