पोलिसातील माणूस


साठवणीतल्या आठवणी बालपणीच्या

मी जन्मलो तेंव्हा पहिले महायुध्द संपून दहा वर्षे झाली होती.१९२८ पर्यंत म्हणजे माझ्या जन्माच्या वेळेपर्यंत या महायुध्दाचे भीषण परीणाम जगभर पसरू लागले.युध्दात प्रत्यक्ष भाग न घेणार्‍या भारतासारख्या देशालाही हे परीणाम ब्रिटीशांच्या कृपेने जाणवू लागले.त्यातच १९२९ ची जागतिक मंदी निर्माण झाली. महायुध्दाचा परीणाम म्हणून निर्माण झालेली ही मंदी ब्रिटीशांच्याच कृपेने भारतातही अवतरली. अगदी छोट्या छोट्या खेड्यातही तिचे पडसाद उमटले.आमचे धुळे जिल्ह्यातील कहाटूळ हे गावही त्याला अपवाद नव्हते.

त्याकाळी पैसा विशेषत: नगद पैसा ही फ़ार दुर्मिळ गोष्ट होती. वस्तु विनिमयाची [barter system] सर्रास वापरात होती.आमच्या घरची परिस्थिती फ़ारशी वेगळी नव्हती.सर्वांप्रमाणेच रुपया गाडीच्या चाकाइतका मोठा भासत असे. पूर्वजांच्या कृपेने आमचे घर चांगले मोठे ,ऐसपैस, गावाच्या मध्यावर हवेलीसारखे होते. गवात इतर बरीच धाब्याची घरे होती.पण धाब्याची घरे आणि आमची हवेली ह्यांच्या आर्थिक परिस्थितीत फार फ़रक नव्हता.जमीन पूष्कळ होती,अगदी ४०-४२ एकर ,पण उत्पादन जेमतेम पोटापूरते होई.त्या काळ्य़ाशार सुपिक जमिनीत धान्य ,कापूस, मिरची भरपूर पिकत असे पण त्याला भावच मिळत नसे. प्रत्येकजण जणू शेतकर्‍याला फसवण्यासाठीच येई.

तो काळ देशाच्या गुलामगिरीचा होत्ता.विज्ञानाची प्रगती ब्रिटिशानी भारतातही आणली.रस्तेबांधणी, रेल्वेबांध्णी केली. पण त्यांनी त्यांच्या सोयीने आर्थिकदृष्ट्य़ा, भौगोलिकदृष्ट्य़ा, व राजकियदृष्ट्य़ा महत्त्वाची शहरे व मोक्याची महत्त्वाची ठिकाणॆ त्यांनी जोडली होती. इतर कमी महत्त्वाच्या वस्त्यांप्रमाणेच आमचा धुळे जिल्हा व सातपुड्याच्या कुशीतील ही चिमुकली गावे ह्या सोयींपासुन वंचितच होती.त्यात तापी नदीचा अडथळा! रस्ते नव्हते व दळणवळणाची बैलगाडीशिवाय किंवा घोडागाडीशिवाय इतर साधने नव्हती.याचा फायदा व्यापारी व सावकार पुरेपूर उठवत. रोख पैश्याच्या गरजेपोटी शेतकरी त्यांच्या जाळ्यात अडकत असे आणि अधिकाधिक कंगाल होत असे.
आमच्या लहाणपणी बहुतेक पुरुषांकडे एक किंवा दोन सदरे आणि दोन धोतर एव्हढेच कपडे असत तर बायकांकडे दोन नऊवारी साड्य़ा आणि हाताने शिवलेल्या दोन चोळ्य़ाएवढेच कपडे असत. मुलांना नवे कपडे क्वचितच मिळत.

Comments

Popular posts from this blog

एक उलट एक सुलट

DREAM THAT IS NOW TRUE

आज खरोखर कसली गरज आहे?