मराठी अक्षरे ङ आणि ञ
DrVinayak Kapure यांनी त्यांच्या भिंतीवर उपस्थित केलेला प्रश्न असंख्य मराठी अबालवृद्धांच्या मनातला प्रश्न असल्याने तिथे comment म्हणून दिलेलं उत्तर थोडं विस्तृत स्वरूपात सर्वांसाठी इथे देत आहे. (अर्थात मराठीच्या जाणकारांना हे माहित आहेच, तरीही.)
#ङ_ञ_व_त्र
मराठी शिकणा-या, बोलणा-या शालेय वयाच्या बालकापासून पुढच्या कोणत्याही वयोगटातील अनेकजणांना मराठी वर्णमाला पाहिल्यावर एक प्रश्न हमखास पडतो कि हे ङ (वाङ्मय हा अपवाद वगळून) व ञ आपण मराठी लिहिताना कुठेच वापरत नसताना का वर्ण म्हणून शिकवले जात असावेत? बरं शाळेत यांचं लेखन व वाचनही शिकवणारे शिक्षक विरळाच. कसा उच्चार करायचा यांचा? मग काही जिज्ञासू शिक्षकांचा अपवाद वगळला तर ङ ला ड आणि ञ ला त्र म्हणत शिकवलं जातं. त्या शिक्षकांचासुद्धा तसा दोष नाहीच, कारण त्यांच्या गुरूजींनीही त्यांना असंच शिकवलं असणार. मग काय आहेत ही अक्षरं नक्की?
मराठी वर्णमालेतील व्यंजनांच्या पहिल्या दोन ओळी (वर्ग) अशा आहेत :
क् ख् ग् घ् | ङ् (क वर्ग)
च् छ् ज् झ् | ञ् (च वर्ग)
ज्या शब्दात क, ख, ग, घ यापैकी एखादं अक्षर असून त्यांच्याआधी आलेल्या अक्षरावर अनुस्वार असतो, तिथे तो अनुस्वार ङ् असतो. उदा. शंख, अंग, रंग, अंक, अंघोळ, इ. पुर्वी हे शब्द शङ्ख, रङ्ग, अङ्ग, अङ्क, अङ्घोळ असे लिहिले जात. यावरून ङ हा क, ख, ग, घ शी संबंधित अनुनासिक आहे हे यावरून लक्षात येईल व त्याचा नेमका उच्चारही लक्षात आला असेलच.
ज्या शब्दात च, छ, ज, झ यापैकी एखादं अक्षर असून त्यांच्याआधी आलेल्या अक्षरावर अनुस्वार असतो, तिथे तो अनुस्वार ञ असतो. उदा. मंच, अंजीर, मांजा, कंचे, झुंज, , इ. हे शब्द पूर्वी मञ्च, झुञ्ज, अञ्जीर, माञ्जा, कञ्चे इ. असे लिहिले जात. यावरून ञ हे च, छ, ज, झ शी संबंधित अनुनासिक आहे हे लक्षात येऊन त्याचा नेमका उच्चारही समजला असेलच.
वाङ्मय हा शब्द वाक्+मय (संधी) असा आहे, त्यात क् चा ङ् झाला आहे. वाङ्निश्चय सुद्धा तसाच. संधी नसेल, स्वतंत्र वर्ण म्हणून वापर नसेल, केवळ अनुनासिक म्हणून येत असेल अशा ठिकाणी ङ् व ञ् हे टिंब/अनुस्वार म्हणून आधीच्या अक्षरावर येतात.
ञ हा अनुनासिक आहे तर त्र हे त् + र = त्र असं जोडाक्षर आहे. दोन्ही भिन्न अक्षरं आहेत आणि त्यांचा उच्चारही भिन्न आहेत हे आता स्पष्ट झाले असेलच.
मराठीत ङ (क वर्ग), ञ (च वर्ग), ण (ट वर्ग), न (त वर्ग) आणि म (प वर्ग) असे पाच अनुनासिकं आहेत. यातील ण, न व म ही स्वतंत्र अक्षरं म्हणून वापरली जातातच,
पण ङ व ञ प्रमाणेच ते कंठ, कंद, कंप या व अशाच अनेक शब्दांत त्या त्या वर्गातील अक्षरांच्या अगोदरच्या अक्षरांवर अनुस्वाराच्या स्वरूपात विराजमान असतात. क, च, ट, त व प या पाच वर्गांतील अक्षरांआधी येणा-या अनुस्वारांचा उच्चार पाच भिन्न प्रकारे होतो, म्हणून प्रत्येकासाठी भिन्न वर्ण उपयोजिला आहे. भाषेत होणा-या प्रत्येक उच्चारासाठी स्वतंत्र वर्ण असावा असा विचार यामागे आहे. मात्र वरील पाचही वर्गांत नसलेल्या श, स व ह या वर्णांअगोदर आलेल्या अनुस्वारांचा उच्चारही भिन्न आहे हे ही लक्षात घ्यावे. उदा. वंश, कंस, सिंह, इत्यादि.
म्हणूनच, जर मराठी वर्णमालेत ङ व ञ हे वर्ण विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी दिलेले आहेत, तर ते शिक्षकांनी शाळेत वरीलप्रमाणे समजावून सांगायला हवेत. अगदी पहिल्या वर्गातच नको, पण पाचवी किंवा पुढील वर्गातील विद्यार्थ्यांना हे नक्की समजू शकेल. ते समजून सांगायला ग्रंथालयांत उपलब्ध स्वातंत्र्यापूर्वी प्रकाशित किंवा मराठीत अनुस्वाराचे नियम बदलण्यापूर्वी छापलेल्या मराठी पुस्तकांचा वापर करणं शक्य आहे. ते उपलब्ध नसतील तर काही संस्कृत सुभाषितांची मदत नक्कीच घेता येईल.
आता तुम्हाला समजला असेलच, तर शिकवाल ना आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना , आपल्या संपर्कातील सगळ्या मराठी भाषकांना ङ् काय असतो ते? ञ व त्र मधला फरकही शिकवाल ना?
~ राजीव मासरूळकर
Comments
Post a Comment