DREAM THAT IS NOW TRUE
आज जेंव्हा मीनल आणि अभिषेक म्हणजे आलाप चा हा एंगेजमेंटचा कार्यक्रम होतोय तेंव्हा माझे मन संमिश्र भावनांनी दाटून आले आहे..आजपासून आलापची ही हक्काची सखी होईल !! जन्मदात्या आई वडिलांसाठी हा क्षण कृतार्थतेचा असतो आणि परीक्षेचाही असतो. आई वडील कितीही जवळचे असले तरी प्रत्येकाला एक आपले असे माणूस लागतेच आणि ते या दोघांना मिळालेय.आता यापुढे दोघांनाही एकमेकांशिवाय जग दिसणार नाही .
दोघानाही आम्हा साऱ्या अनुभवी आणि संसारी लोकांचा अनुभव एका वाक्यात सांगते ......
एक क्षण असतो भाळण्याचा आणि सारे आयुष्य असते नाते सांभाळण्याचे!!
अर्थात आलापला केवळ सखी मिळाली असे नाही तर मलाही किंबहुना आम्हा दोघानाही एक मैत्रिणीसारखी सून मिळेल याचा खूप आनंद होतो आहे.आम्हाला हा आनंद मिळवून दिलाय तो आम्हाला पुत्रवत असलेल्या आमच्या दिराने,डॉ.प्रशांत भाई यांनी !या नाते सम्बधाची पहिली सुरुवात केली ती त्यानी आणि त्यांच्या त्या एका फोन चे आज इतके मोठे रूप झाले.जणू एका छोट्या बीजातून एखादा सुंदर वेल वाढावा तसे झालेय. आणि त्या वेलाला भेटीगाठी करून ,नाते निर्माण करण्याचे म्हणजे पाणी घालुन मोठे करण्याचे कार्य केले ते ते डॉ.विलास भाई आणि हेमा या माझ्या प्रेमळ दीर आणि जावेने !!लग्नाच्या गाठी जरी स्वर्गात बांधल्या जात असल्या तरी भूलोकीचे प्रयत्न लागतातच . आपल्या सुहृदांशिवाय हे काम कोण करेल? !या साऱ्यांच्या प्रयत्नाने आज हा कार्यक्रम यशस्वी होतोय.
तशी मी आजच मुलांच्या लग्नाला सामोरी जातेय असे नाही . माझ्या मुलीचे लग्न होऊन आज दहा वर्षे झाली आहेत. . एका सोन्यासारख्या जावयाची सासू झाले आहे. माझ्या मुलीच्या घरच्या लोकांकडून मला ,आम्हाला खूप आधार मिळाला. ,तिच्या सासूबाई म्हणजे ताई,सासरे आण्णा यांनी जे प्रेम ,आपुलकी आम्हाला दिली त्याची तुलनाच होऊ शकत नाही. मी एक मुलगी दिली आणि बदल्यात फक्त मुलासारखा जावईच नाही तर कितीतरी प्रेमळ लोक मिळवले .
चार गोड शब्द बोलणे म्हणजे इवल्याश्या खारीच्या पाठीवर रामाची चार बोटे उमटवण्यासाराखेच असते.हेही त्यांच्या वागण्यातून जाणवत गेले..आज स्वप्नाली माझी मुलगी आणि योगेश आमचे जावैई इथे नसले तरी त्यांची उणीव आम्हाला तिची जाऊ शीतल आणि तिचे मोठे दीर राजू भाई यांनी जाणवू दिली नाही . इतके हे प्रेमळ आहेत.हे पुन्हा पुन्हा सांगायचे कारण जर मीच इतका छान अनुभव एक सासू म्हणून घेतला असेलआणि सून म्हणून माझ्या मुलीलाही इतके प्रेम मिळाले असेल तर तसाच अनुभव मीनल ला आणि तिच्या नातेवाईकांना आमच्याकडून मिळेल.कारण रामाची बोटे उमटवण्याची ही परंपरा आता सुरु झाली आहे आणि ती चालू रहायला पाहिजे.
खरे म्हणजे मीच माझ्या भावी सुनेची इतकी वाट पाहत होते कि
मनाच्या तळमळे चंदने ही अंग पोळे।।
.म्हणजे मनाच्या त्या तळमळीने चंदनाने सुद्धा शरीराचा दाह व्हावा असे झाले होते. मन उतावीळ होते पण आपल्या घराशी ,घरातल्या माणसांशी जुळवून घेईल अशी मुलगी प्रत्येकाला हवी असते. भारतात तरी लग्न हे फक्त दोन व्यक्तींचे नसते तर दोन कुटुंबांचे असते. गंगाराचा स्वर्ग करावा की नरक हेही सगळ्यात जास्त स्त्रीवर अवलंबून असते. अर्थात शोधाशोध चालू होतीच आणि ही गोड मुलगी आम्हाला अगदी जवळच सापडली. गंमत अशी की सुनेचा शोध करताना एक शहर बाकी ठेवले नाही आणि आमच्याच गावाची ही भाची नजरेआड राहिली.
हैरानीका सबब क्या निकले
अपनेही चेहरेसे आईना निकले.।।
तमाम दुनिया घुमके आए और
दिलके पास मंजिल निकले।।
अशीच आमची अवस्था झाली!.
आज मीनलच्या आई पुष्पाताई याही आनंद आणि थोडी काळजी अश्या मनोवस्थेत आहेत .साऱ्याच आयांची अशीच अवस्था होते का? कारण
सुख देती हुई माओंको गिनती नाही आती ,
जैसे पिपलकी घनी छावोंको गिनती नाही आती ।।
हेच आईचे प्रेमळ रूप आहे. त्यानी आजपर्यंत ज्या मुलीला पेमाने सांभाळले ती लवकरच दूर जाणार याचे वाईट वाटणे साहजिक आहे पण आता त्यांची मुलगी दूर जाणार नाही तर आम्ही त्यांच्या जवळ जावू आणि एक कुटुंब बनवू. मी जेंव्हा मिनलशी बोलले,,भेटले त्यानंतर मला एक कविता सुचली ती मी आता तुमच्यापुढे सादर करतेय .हे एका सासूचे मनोगत आहे.
Sunday, March 3, 2013
वाट पाहते घर येईल राजस पाहुणी
येईल घरी ती रुणझुणत्या पायांनी (कारण ती येणार आहे आनंदाने,प्रेमाने)
बोलेल ती कशी मधु मंजुळ बोलांनी
ऐकेन मग ते माझ्या भरल्या मनानी
दाराचा उंबरा हा कधीचाच उदास
ती रेखून रांगोळी भरेल प्राकारी सुवास (प्राकारी म्हणजे अंगणात कसा सुवास पसरेल तर...)
तोरण फुलांचे लावेन ग दारी म्हणे
यायची लक्ष्मी तिला पाठवू अंबारी
शिकलीसवरली लेक गुणाची मोलाची
जिंकील मने सारी मृदू मधुर बोलानी
आईचे ते लेकरू सासरी गं पोचावे
कर्तृत्वाच्या झोक्यावर उंच उंच झुलावे
येईल घरी ती रुणझुणत्या पायांनी (कारण ती येणार आहे आनंदाने,प्रेमाने)
बोलेल ती कशी मधु मंजुळ बोलांनी
ऐकेन मग ते माझ्या भरल्या मनानी
दाराचा उंबरा हा कधीचाच उदास
ती रेखून रांगोळी भरेल प्राकारी सुवास (प्राकारी म्हणजे अंगणात कसा सुवास पसरेल तर...)
तोरण फुलांचे लावेन ग दारी म्हणे
यायची लक्ष्मी तिला पाठवू अंबारी
शिकलीसवरली लेक गुणाची मोलाची
जिंकील मने सारी मृदू मधुर बोलानी
आईचे ते लेकरू सासरी गं पोचावे
कर्तृत्वाच्या झोक्यावर उंच उंच झुलावे
स्वप्न हे उद्याचे होवू दे ग साकार
आई जगदंबे तुझ्या चरणी नमस्कार !!
तर अश्या आमच्या आशा आकांक्षा !! तश्या त्या प्रत्येक स्त्रीच्या असतातच. इच्छा असतात ,स्वप्न असतात. खरे म्हणजे आपण सारेच आशेवर ,स्वप्नांवर जगात असतो. हे दोघेही उद्याच्या स्वप्नात रमतील शिक्षण ,पदवी दोघांकडेही भरभक्कम आहेच व त्यामुळे ते यशस्वी होतीलच !शिक्षण पदव्या ह्या गोष्टी चिलखतासारख्या वागवायच्या असतात ते व्यावहारिक युद्ध जिंकण्यासाठी पण संसारात मन आणि माणुसकी हेच महत्वाचे!!
हे लिहिले आणि साक्षात स्टेज वरून बोलून दाखवले त्याला आता पाच साडेपाच वर्षे झाली . एक गोड़ सई सारखी मुलगी आम्हाला भेट मिळाली. घर आनंदाने भरून गेले आहे. काही कमी काही जास्त असायचेच पण मीनल ने आजही आम्हाला जसे वाटले तसेच प्रेम दिले. तिच्या वागण्यातून बोलण्यातून आमच्याविषयीची काळजी प्रेम जाणवत राहिले. ना चुकता येणारे फोन रोज आनंद देत राहिले. होणारे त्रास किंवा ताण आम्हाला ना कळू देण्याची धडपड जाणवत राहिली. केवळ आम्हालाच नाही तर आमच्या मुलीला स्वप्नालीलाही एक छान मैत्रीण मिळाली. एका आईला आणखी काय हवे?
THANKS A LOT MINAL !!
Comments
Post a Comment