एक उलट एक सुलट

शहाद्याच्या 45° च्या काहिलीतून बाहेर पडलो  आणि  39°च्या  मुंबई  कुकरमध्ये शिजून  निघालो.  पुन्हा 5 दिवस नेपाळ मध्ये  धम्माल  केली.  मग  एक दिवस  मुंबई  नाशिक  मुंबईचा  ट्राफिक  चा घनचक्कर अनुभव घेतला.  शिवाय मुंबई  कुकर ते मुंबई  कुकर  व्हाया नाशिकच्या  प्रसन्न हवेचा  अनुभव घेतला. मग तश्याच  उकाड्यात  युद्धपातळीवर नेपाळच्या  बॅगा  रिकाम्या  करून  कपडे आणि घर आवरून  अमेरिकेच्या बॅगा  भरल्या.  त्यात  नेहमी प्रमाणे  वजन हा प्रश्न  ऐरणीवर होताच. शिवाय  सोसायटीचे कामही चालू होतेच. लष्कराच्या भाकर्‍या  भाजणे काही  संपत  नव्हते. या धबडग्यात आमचे व्याही आणि  विहीण  बाईच आमचे डावे उजवे हात  झाले. अखेर  आम्हाला  विमान तळावर सोडून  तेही त्यांच्या  गृही मार्गस्थ  झाले. 22 तासात  दोन  वेळा  विमान बदलून  एकदाचे अमेरिकेला पोहोचलो.
विमान  तळावर प्रश्नावलीला सामोरे  जात एकदाचे विमानतळा बाहेर पडलो  आणि पहिल्यांदा  स्वच्छ  हवेत एक दिर्घ  श्वास  घेतला.
आहा! एखाद्या   जायंट व्हील वर गरागरा  फिरून थांबलो की  थोड्या वेळाने  होते तशी आता  मनस्थिती आहे.
ही गोष्ट आहे २०१६ची!

       आता २०१९ च् जून मध्ये नेमकी उलट स्थिती होणार आहे. आम्ही अमेरिकेतला सहा महिने मुक्काम संपवून भारतात दाखल होत आहोत.  इथे सहा महिने मुलीच्या प्रेमळ देखरेखीखाली व्यायाम, मसाज करून घेत, मुलासुनेकडे छोटुकल्या नातींबरोबर खेळत, मोठ्या नातींबरोबर धमाल करत दिवस भराभरा गेले.
आरामे आराम झाला. छान प्रसन्न थंड हवा ,कमालीची  स्वच्छता ,डोक्यावर कसलाही ताण नाही. आज हे करायचे राहिले, याची डेडलाईन आली. असा त्रस्त करणारा विचार नाही. अंधेरीच्या घरात हे आणायचे आहे. नाशिकला ते  आणायचे राहिले असे काही सहा  महिने  विसरूनच गेले होते.

     पण आता पुन्हा एकदा आयुष्याला भिडायचे आहे.  सहा महिने बंद असलेली घरे उघडून साफसफाई पासून ते पावसाळी सहलीपर्यंत , माझी वाट पाहणारी मातीविरहित बाग ते माझ्या गोड सोबत्यासाठी रक्त शर्करेची तपासणी शिवाय इतर वार्षिक तपासण्याकरण्यापर्यंत!! सारे कसे वाट पहात आहे. भरीला आहे पा़वसाआधीचा मुंबईतला गदमदणारा उकाडा आणि नाशिक  शहाद्याचा कडाडणारा उन्हाळा!! 
        चला पुन्हा सज्ज होतोय जायंट व्हील वर गरागरा फिरण्यासाठी आणि सोबत दोन नाती आहेतच पहिल्या वहिल्यांदा  आईवडिलांशिवाय एकटे भारताचा अनुभव घ्यायला आणि ओल्या मातीचा गंध पहिल्यांदा अनुभवायला!!

झुंईईईईईईईईईईई........ 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गांधींबद्दल

गणपती बाप्पा मोरया

पाऊस