देवभूमि

 किती वर्ष झाली ,  एकदा तरी  देवभूमीला केवळा  भेट देवू या  असे मनात   घोळत होते. आला एकदाचा तो योग ! एकट्याने  जाण्यापेक्षा  गृपने जाऊ ,  जास्त मजा येईल म्हणून दहा जण निघालोय.  जास्त  दगदग  नको म्हणून  जाणे येणे विमानाने! त्यात सहा जण आयुष्यात  पहिल्यांदाच  विमान प्रवास  करणारे होते.

 

  काल सकाळी  आमच्याकडे  सगळे  जमले. सुचनेबरहुकूम त्यांनी  बॅगा  वजन आटोक्यात  ठेवून  भरल्या  होत्या. मग पर्समध्ये  चाकूच काय पण नेलकटर सुद्धा  नको  असे सांगून  मी त्यांना पॅकींगमध्ये बदल करायला  लावले. आमच्याकडे  प्रवासी कंपनीने  त्यांच्याही केबीन बॅगा  एकूण दहा पोचवल्या होत्या.  त्या दिल्या  आणि  काही   सामान त्यात  हलवले. हुश्श करत सगळे तैय्यार झाले बाबा!!



    मस्त पैकी  घरची साजूक तूपातली पुरणपोळी,  आमरस त्यावर सढळ हस्ते  तुपाची धार , कटाची झणझणीत आमटी,  मिरचीभजी , पनीरपकोडा , असे साग्रसंगीत  मी रांधले होते. व्याही  विहीणी आणि  नणंदोई नणंद बाई जेवणार होते.  तेही एकदम सुगरण! 😀 पोटभर सुग्रास  जेवून निघालो. 


     गेटवरच्या पांडेभैयाच्या कृपेने पाच रीक्षा पोहोचल्या सोसायटीत !   मग त्यात सामान आणि माणसे भरून😉 एकामागोमाग एक  सगळी वरात विमानतळावर!  नऊ चेक इन बॅगा  आणि  पाच  केबिन बॅगा!!  आधीच्या काही दिवसात असलेल्या धावपळीमुळे   आमच्या  बॅगा  आदल्या दिवशी रात्री जेमतेम  भरल्या होत्या. चेक इन चे सोपस्कार  आटोपून सिक्युरीटीकडे वळलो. ही भलीमोठ्ठी  रांग!!

केबिन बॅगा   स्क्रीनींगला टाकून  पुढे काउंटर  पलीकडे  पुन्हा  घ्यायला आलो. 


   शिक्युरिट्टीबाबाने  नेमकी माझी बॅग उचलून खाली  ठेवली . 

मग मी ," अहो , अहो साहेब!"

साहेब ऐकू आले नाही  असे दाखवत इतर बॅगा  देत राहिला. मग पुन्हा  मी ,"सर ,  माझी बॅग द्या ना!"


त्याने शेजारच्याला सांगितले  ," पाण्याची  बाॅटल आहे  आत!" तोही  म्हणे  ,"हाॅ है!" " निकालो "  "ऐं! क्या? " मग मी सोशल वर्क  करत म्हटले "भाई , पानीका बोटल है ना बॅगके अंदर वो निकालो".  दाखवली त्याने काढून भारीपैकी बाॅटल ! पुन्हा  ठेवायला लागला. शिक्कूरिटी " ही खाली करा."  "हांहां"  पुन्हा  ठेवायला  लागला. मग मी " भाई , अभ्भीच खाली  करो. पी लो."  तो हताश " क्या"?  मग सिक्युरीटीवाला मदतीला  धावला." वो सामने बेसिन में  गिराके आव."  तोवर मी दोन चार रिकाम्या टोपल्या उचलून  सिक्युरीटी वाल्यांना  मदत केली. 


 मग पुन्हा  एकदा  " सर बॅग द्या  ना!  काही  प्राॅब्लेम  आहे का? " त्याने  समोर बॅग  आणली. " ह्यात नेलकटर आहे बहुतेक!!" म्हटले " नाही हो " अन् एकदम आदल्या  दिवशीच  हरवलेले नेलकटर आठवले. ह्यात टाकले कि काय? एकदम ब्रम्हांड आठवले. आता ही सगळी  बॅग उचकटा . पुन्हा  रचा. अरे देवा!! तोवर आमचे पाच सहप्रवासी  गेटकडे  वळले.  चार मदतीला धावले. चेहरा जबरदस्तीने हसरा ठेवत पती परमेश्वर  "बघ ग एकदा! " मी माझे मेकअप  ऑर्गनायझर  बाहेर  काढले. त्यात  शेकडो  कप्पे  होते बोट पण घुसणार  नाही  असे बारीक   बारीकसारीक सामान  ठेवायची सोय. हाताने चाचपून पाहीले , काही  नाही!!   एकाने प्लॅस्टीकची  टोपली आणली ." ताई,  यात रीकामे करा  .म्हटले हेच टाक स्क्रीनींग  ला ! मग त्याने ताब्यात घेतले आणि बाब्बौ! काढला की आतून बटन चाकू! कधीतरी  हौसेने फळं कापायला म्हणून  घेतलेला अन् नीट रहावा , लगेच सापडावा  म्हणून एका कप्प्यात  दाबून बसवलेला  होता. विसरूनच गेले होते.  हेही आणि सहप्रवासी ही चकीत !


इतकी हुश्शार बाई! सकाळ पासून सतरा सूचना देणारी आणि अशी चूक!! माझा चेहरा निवडणूकीत पडलेल्या  उमेदवारासारखा झाला. चेहर्यावर आश्चर्य  दाखवत शिक्कूरीटी वाल्याने 'फक्त' माझा बोर्डींग  घेऊन रजिस्टर  मध्ये  नोंद केली. म्हटले ,"अरेच्चा  ,चुकून राहिला बहुतेक , ठेवा इथेच! जाऊ दे , मला नको ."  जसे काय मला तो परतच देणार होता. 🤓. बॅग  ताब्यात घेऊन निघालो एकदाचे!!


तीन तास आधी विमानतळावर  पोचण्याचे फायदे!!😀😁


संध्याकाळी साडेसहाला कोचिन नव्हे  तर कोच्ची च्या विमानतळावर  उतरलो. हल्लीच्या विमानात पैश्याशिवाय पाणी ही देत नाहीत. एखादी छोटी रीकामी बाटली  जवळ  ठेवून  सिक्युरीटी झाल्यावर जागोजागी  असलेल्या  पिण्याच्या पाण्याची सोय असलेल्या  ठिकाणी भरून घेणे बरे पडते. मुंबईच्या प्रचंड विमानतळापुढे हा छोटासा आटोपशीर विमानतळ  खूप गोड लहान मुलांसारखा वाटला. संध्याकाळच्या संधीप्रकाशात दिसणार्या , लाल कौलारू छप्पर असलेल्या , एकाला एक जोडून दिसणार्या  बंगल्यासारख्या इमारतीच्या  ही संध्या एकदम  प्रेमात पडली आहे. फोटो सुद्धा  काढायचा  राहिला. 😍

Comments

Popular posts from this blog

गांधींबद्दल

गणपती बाप्पा मोरया

पाऊस