DrVinayak Kapure यांनी त्यांच्या भिंतीवर उपस्थित केलेला प्रश्न असंख्य मराठी अबालवृद्धांच्या मनातला प्रश्न असल्याने तिथे comment म्हणून दिलेलं उत्तर थोडं विस्तृत स्वरूपात सर्वांसाठी इथे देत आहे. (अर्थात मराठीच्या जाणकारांना हे माहित आहेच, तरीही.) #ङ_ञ_व_त्र मराठी शिकणा-या, बोलणा-या शालेय वयाच्या बालकापासून पुढच्या कोणत्याही वयोगटातील अनेकजणांना मराठी वर्णमाला पाहिल्यावर एक प्रश्न हमखास पडतो कि हे ङ (वाङ्मय हा अपवाद वगळून) व ञ आपण मराठी लिहिताना कुठेच वापरत नसताना का वर्ण म्हणून शिकवले जात असावेत? बरं शाळेत यांचं लेखन व वाचनही शिकवणारे शिक्षक विरळाच. कसा उच्चार करायचा यांचा? मग काही जिज्ञासू शिक्षकांचा अपवाद वगळला तर ङ ला ड आणि ञ ला त्र म्हणत शिकवलं जातं. त्या शिक्षकांचासुद्धा तसा दोष नाहीच, कारण त्यांच्या गुरूजींनीही त्यांना असंच शिकवलं असणार. मग काय आहेत ही अक्षरं नक्की? मराठी वर्णमालेतील व्यंजनांच्या पहिल्या दोन ओळी (वर्ग) अशा आहेत : क् ख् ग् घ् | ङ् (क वर्ग) च् छ् ज् झ् | ञ् (च वर्ग) ज्या शब्दात क, ख, ग, घ यापैकी एखादं अक्षर असून त्यां...