माझे आण्णा

माझे वडील म्हणजे आपल्या गुजर समाजातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व !एल.आर.पाटील उर्फ एल .आर. फौजदार या नावाने ते सर्वाना परिचित होते.
मुंबईत कोणाचे काही काम अडले असेल तर त्या समाज बांधवाला सर्वतोपरी मदत करण्याचे कंकण त्यानी हाती बांधले होते. जोपर्यंत ते पोलीस खात्यात काम करत होते तोपर्यंत त्यानी वेळात वेळ  काढून आपल्या समाजासाठी कामे केली. शहादा येथील विकास हायस्कूल व आपल्या जन्माग्रमातील कहाटूळ येथील शाळेसाठी त्यांनी मोठा निधी उभारून दिला.गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आठ तारखेला त्यांचे दुख:द निधन झाले .त्यांच्या काही आठवणींपैकी ही एक!! 

                      रेडीओवर गाणे लागले होते. शब्द झरत होते "पप्पा सांगा कुणाचे ........."  मग मला आठवले ते आमचे आण्णा ! असेच दुसरे गाणे "आई आणखी बाबा यातील कोण आवडे अधिक तुला सांग मला रे सांग मला!"!!हेही असेच मनात कालवाकालव करणारे गाणे!! मला एकदम माझ्या वडिलांची, आण्णांची आठवण आली .खूप दिले त्यानी आम्हाला!
पोलिस खात्यातील रुक्ष नोकरी करताना त्यांनी निसर्गावर प्रेम करणे सोडले नाही वेळ मिळेल तेंव्हा एक दिवसासाठी का होईना पण जंगलात नेले.सुदैवाने बोरीवलीचे जंगल जवळ्च होते.एकदा असेच आम्ही सहलीला गेलो होतो. आम्हाला एका जागी बसवून आई आणि आण्णा लाकडे गोळा करायला गेले. बेत होता बाटी आणि दाल करण्याचा,मग आम्ही पण उत्साहाने छोटे लाकडाचे तुकडे गोळा करायला लागलो. आम्ही सगळे जवळपासच फिरत होतो पण माझा लहान भाऊ विलास जरा आत गेला आणि जंगलात हरवला. सगळे एकत्र आले तरी हा दिसेना .आईच्या तोंडचे पाणी पळाले. आम्ही आपले चिडीचूप !मग आण्णा एका दिशेने आणि आई दुसर्या दिशेने त्याला शोधात गेले. काही अंतर गेल्यावर एका झाडाखाली तो रडत उभा होता .त्याला घेऊन आले. त्यानंतर ह्याप्रसंगाचे कुठलेही सावट न पडू देता ती ट्रीप आम्ही मजेत केलीच पण हाही धडा शिकलो कि जंगलात कसे फिरावे ,वाटा कश्या लक्षात ठेवाव्या.

              त्यांनी नुसते जंगलात  नेले नाही तर झाडांची आणि मातीची ओळख करून दिली.पानाच्या आकारावरून ,वासावरून झाड कसे ओळखावे हे आण्णांनी सांगायचे आणि त्याचा औषधी उपयोग काय हे आई सांगायची.जंगलात नुसते जावून मस्ती करण्यापेक्षा जंगल वाचायला त्यानी आम्हाला शिकवले.
        फक्त आम्हालाच नव्हे तर आमच्याबरोबर येण्याची इच्छा असलेल्या आम्हा भावंडांच्या मित्र मैत्रिणींना येण्याची पूर्ण परवानगी असे.आमच्याबरोबर त्यांच्याही ज्ञानात भर!!पण हे करताना आपण काही वेगळे करतोय असे जराही वाटू दिले नाही.माझी एक मैत्रीण अश्याच एका सहलीत आमच्या बरोबर सामील झाली .तेंव्हा ती पहिल्यांदाच कारमध्ये बसली होती आणि सहल हा प्रकारही पहिल्यांदाच अनुभवत होती. पण आई आणि आण्णांनी तिला कसलाही न्यूनगंड वाटणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. जणू आपलीच मुलगी असल्यासारखे तिला वागवले आणि एक निखळ आनंद तिला मिळवून दिला .मलाही शिकवले कि देण्यात किती आनंद असतो .आज जेंव्हा माझी मुलगी उत्साहाने सहलीची तयारी करते , तिच्या अमेरिकेत जन्मलेल्या मुलींना भारतीय झाडांची ओळख करून देते आणि माझा मुलगा अमेरिकेत त्याच्या छोटीला  जंगलात नेतो झाडापानांची ओळख करून देतो तेव्हा हा वारसा पुढे गेला  ह्या समाधानाने मन भरून येते.

Comments

  1. छान. खरोखरी च मना ला भावली

    ReplyDelete
  2. Khup chan lihilays, Mummy! Agdi khare! "Picnic" kiwwa "nature" he shabd uccharle ki Ajobach dolya samor ubhe rahataat!! Miss him a lot!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गांधींबद्दल

गणपती बाप्पा मोरया

पाऊस