टिटू

 दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सक्काळी टीटू चे सर आले .आम्ही सारे मुलांचे नवे ट्युशन चे सर घरी येतात तेंव्हा जसे उत्सुक असतो तसेच होतो.आता हे काय सांगतील?

आपला सोन्या अभ्यास करेल का? त्याला ह्या सरांचे शिकवणे आवडेल का? मनात असंख्य प्रश्न होते. तर सर म्हणून ज्यांनी प्रवेश केला त्यानी टीटू चे  कौतुक केले. आमची छाती अभिमानाने फुगली ."आहेच आमचा सोन्या हुश्श्यार!!" त्यानी त्याला जवळ बोलावले तसे आमचे महाराज शेपूट फलकवत जवळ गेले.तसं टीटू जात्याच प्रेमळ ! नुसता दांडगा देह आणि प्रेमळ मन ! 

       सरांनी आमच्या अभिमानाला पहिली टाचणी लावली. "किती महिन्यांचा हा?" म्हटले "तीन महिने!"सर म्हणाले ,"अरेरे !हा जरा जास्तच मोठा झालाय शिकवण्यासाठी!" उशिरा शाळेत मुलाला घालणाऱ्या पालकाच्या काळजीने आणि धाकधुकीने ,शरमेने मी विचारले ,"मग आता?" ते म्हणाले,"बघू ,शिकवू जमेल तेव्हडे!" "  पण सर साधारण कधीपासून शिकवायला सुरुवात करायला हवी होती?",मला माझी उत्सुकता गप्पा बसू देईना . अहो ताई ,पिल्लू एक महिन्याचे झाले की शिकवायला सुरुवात करावी लागते. नंतर त्याच्या सवयी पक्क्या होत जातात!!" इति सर.अच्छा! माझ्या ज्ञानात नवीन भर पाडली. हौसेहौसेने आणलेला हा टीटू मला काय काय शिकवत होता. सर पुढे म्हणाले ,"अहो माणसाचे आणि कुत्र्याचे वयाचे हिशोब वेगळे !माणूस साधारण पणे सरासरी १०० वर्षे जगतो तर कुत्रा २० वर्षे!म्हणजे १ वर्षाचा कुत्रा हा २० वर्षाच्या माणसा इतकाच समजला पाहिजे नं!" मी मान डोलावली .

         त्यादिवशी त्यानी घरात कोण कोण आहेत, टीटू जवळ जास्तीत जास्त कोण असते वगैरे चौकशी केली. मी मोठ्या अभिमानाने सांगितले की आल्यापासून मीच जास्तीत जास्त वेळ  त्याच्याबरोबर आहे . त्यावर टी टू चे गुर्जी म्हणाले ,"तरीही घराचा खरा मालक कोण हे कुत्र्यांना बरोब्बर कळते .डॉ. स्वतः जरी त्याला फिरवत नसले तरी तो त्यांनाच  मालक म्हणून ओळखेल .ह्या बाबतीत ते लहान मुलांसारखेच हुशार असतात.योग्यवेळी योग्य माणसाला मस्का लावतात ." मंडळी खरेच ह्या वाक्याचा मला इतक्यावेळा अनुभव  आला की काय सांगू. मग गुरुजींनी त्याच्या गळ्यातील पट्टा ,त्याला जोडायचा लांब पट्टा वगैरे तपासले. त्यावेळी त्याला सांभाळता यावे  आणि छान दिसते म्हणून मी त्याच्या गळ्यात स्टीलची चेन अडकवली होती त्या ऐवजी त्यानी टीटू साठी हाफ स्टील चेन आणायला सांगितली.कारण स्टील चेन मुळे त्याच्या गळ्याला जखम होण्याची शक्यता होती. श्वास अडकून त्याला त्रास झाला असता. जोपर्यंत कसे शिस्तीत चालावे हे कळत नाही तोपर्यंत त्याला छाती भोवती लावायचा पट्टा आणायला सांगितला.

          थोडावेळ टीटू शी खेळून ,त्याला बक्षीस म्हणून त्याची अत्यंत आवडती मारी बिस्कीट देवून सर गेले.ते दुसऱ्या दिवसापासून टीटूची शाळा सुरु करुया असे सांगूनच!!!

Comments

Popular posts from this blog

गांधींबद्दल

गणपती बाप्पा मोरया

पाऊस