दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सक्काळी टीटू चे सर आले .आम्ही सारे मुलांचे नवे ट्युशन चे सर घरी येतात तेंव्हा जसे उत्सुक असतो तसेच होतो.आता हे काय सांगतील? आपला सोन्या अभ्यास करेल का? त्याला ह्या सरांचे शिकवणे आवडेल का? मनात असंख्य प्रश्न होते. तर सर म्हणून ज्यांनी प्रवेश केला त्यानी टीटू चे कौतुक केले. आमची छाती अभिमानाने फुगली ."आहेच आमचा सोन्या हुश्श्यार!!" त्यानी त्याला जवळ बोलावले तसे आमचे महाराज शेपूट फलकवत जवळ गेले.तसं टीटू जात्याच प्रेमळ ! नुसता दांडगा देह आणि प्रेमळ मन ! सरांनी आमच्या अभिमानाला पहिली टाचणी लावली. "किती महिन्यांचा हा?" म्हटले "तीन महिने!"सर म्हणाले ,"अरेरे !हा जरा जास्तच मोठा झालाय शिकवण्यासाठी!" उशिरा शाळेत मुलाला घालणाऱ्या पालकाच्या काळजीने आणि धाकधुकीने ,शरमेने मी विचारले ,"मग आता?" ते म्हणाले,"बघू ,शिकवू जमेल तेव्हडे!" " पण सर साधारण कधीपासून शिकवायला सुरुवात करायला हवी होती?",मला माझी उत्सुकता गप्पा बसू देईना . अहो ताई ,पिल्लू एक महिन्याचे झाले की शिकवायला सुरुवात करावी लागते. नंत...